lockdown

गेल्या दीड महिन्यापासून अत्यावश्यक दुकाने वगळता बंद असलेल्या इतर दुकानांचे शटर लवकरच ‘ओपन’ होणार असून तसेच संकेत मुंबई पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार आहे. सध्या सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. १ जूनपासून इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी देताना सम विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून अत्यावश्यक दुकाने वगळता बंद असलेल्या इतर दुकानांचे शटर लवकरच ‘ओपन’ होणार असून तसेच संकेत मुंबई पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार आहे. सध्या सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. १ जूनपासून इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी देताना सम विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासून देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले. मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या आटोक्यात आली. फेब्रुवारीत लोकल ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिल्याने तसेच बार, पब, हॉटेल, मार्केट, मॉल उघडल्याने नागरिकांची गर्दी वाढली. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने नाईट कर्फ्यू, जमावबंदी लागू केली. विकेंड कर्फ्यूही लावला. त्यानंतरही रुग्णसंख्या कमी न झाल्याने १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आले.

  लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर पावसाळा जवळ येत असल्याने त्यासाठी तयारी करता यावी, अशी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मुंबईत रुग्णसंख्या कमी होत आहे. ७ ते ११ हजारपर्यंत गेलेली रुग्णसंख्या हजारावर आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलथा देण्याचा विचार करण्यात येत आहे. लाॅकडाऊन शिथिल करण्याबाबत राज्य सरकारला विनंती केली जाणार आहे.

  राज्य सरकारने हिरवा कंदील दिला तरी सुरुवातीला काही दिवस सकाळी रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सुरु ठेवणे तर दुपारनंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुची दुकाने सुरु ठेवण्याबाबत किंवा एक दिवस रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत पालिका विचार करत आहे. याबाबत राज्य सरकार व मुंबई महापालिका १ जूनला नवीन नियमावली जाहीर करणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

  एमएमआर क्षेत्रातील रुग्णसंख्येवरही लक्ष

  मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कडक लाॅकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आले आहे. परंतु मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई, विरार या परिसरातील रुग्ण संख्येवर पालिकेचे लक्ष आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलथा दिल्यास लोकांची एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा सुरू होऊन कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याचे काकाणी म्हणाले.

  नव्या नियमावलीतील अशा असतील संभाव्य बाबी

  • मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी; त्याच ठिकाणी बसून मद्यपान करण्यावर बंदी
  • हॉटेल उघडण्यास मंजुरी असणार, पण लोकांना हॉटेलमधून घेऊन जाता येईल पार्सल जेवण
  • मुंबई लोकल बंद ठेवण्यात येईल; दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत असणार
  • ई-पासशिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाहीच; १५ जूननंतर जिल्हाबंदी उठविण्याचा निर्णय
  • रूग्ण कमी असलेल्या जिल्ह्यांअंतर्गत सार्वजनिक वाहतूक ५० टक्‍क्‍यांच्या निर्बंधात सुरु राहिल
  • शहर-जिल्ह्यातील ज्या भागात रूग्णसंख्या अधिक आहे, अशा ठिकाणी निर्बंधात शिथिलता नसेल

  दुकाने सम-विषम या तत्वावर सुरू ठेवता येतील. म्हणजे एका दिवशी केवळ रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकानेच सुरु ठेवणे, तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या उजव्या बाजुची दुकाने सुरु ठेवणे. याबाबत १ जूनला मुंबई महापालिका नियमावली जाहीर करणार आहे. मात्र दुकानांत गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, स्वच्छताविषयक नियम पाळावे लागतील. वाहतूकीची व्यवस्था देखील दुकानदारांनाच करावी लागणार आहे.

  - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पालिका