ऐन गणेशोत्सवात फळे, भाज्या महागल्या

हातात पैसा नसतानाच अनेक जणांनी गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्याकडे कल दिला असला, तरी घरात लागणारे धान्य, भाजीपाला, पूजेला लागणारी फळे, चांगलीच महागली आहेत.

मुंबई : ऐन गणेशोत्सवात फळे आणि भाजीपाल्याचे दर चांगलेच भडकले आहेत. गेले काही महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू होते. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, आजही व्यापार, व्यवसाय, लघु उद्योग, अनेक उद्योग बंद असल्याने अनेक जण घरीच आहेत. अर्थचक्राची गतीही कोरोना संक्रमण काळात मंदावली आहे त्यामुळे लोकांच्या हातात पैसा उरलेला नाही. अशातच किराणा, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे यांची आवकही कमी होत असल्याने आणि सतत पडणाऱ्या पावसाचा परिणामही दरावर झाला आहे. यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर ऐन गणेशोत्सवात भडकले आहेत. हातात पैसा नसतानाच अनेक जणांनी गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्याकडे कल दिला असला, तरी घरात लागणारे धान्य, भाजीपाला, पूजेला लागणारी फळे, चांगलीच महागली आहेत.

पूजेला लागणारा केवडाही २० ते २५ रुपये नग, पपनस फळ ६० ते ७० रुपये नग या दराने विकला जात आहे. कोथिंबीर जुडी तब्बल ५० रुपयांवर गेली आहे. झेंडूचीही बाजारात आवक कमी झाल्याने तो २०० रुपये किलोने विकला जात आहे. गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने बाजारात भाजी येत नसल्याचे भाजीपाला विक्रेत्याने सांगितले, शिवाय येणारी भाजीही अनेकदा लवकर सततच्या पाण्यामुळे कुजत असल्याने हा फटकाही सहन करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवात दर वाढल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच दर पूर्वपदावर येतील, अशी आशा आहे. – अमोल यादव, भाजी विक्रेता

भाज्यांचे दर (₹पयांत)

गवार ८०
टोमॅटो ५०
मटार १२०
पावटा ६०
कोबी ८०
फ्लॉवर ८०
मिरची ३०
आले १२०
कांदापात ३०
कोथिंबीर ५०
(दर प्रतिकिलो)