एसटी महामंडळासमोरील भविष्यातील आव्हानं? येत्या काही वर्षात एसटी कशी तग धरणार?

महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेचे हक्काचं वाहन म्हणून एसटी कडे पाहिले जाते. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी - विद्यार्थिनी, ग्रामीण महिला अशा अनेकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी एसटीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले वाहतुकीचे जाळे पसरले आहे .तब्बल ६०९ बसस्थानकाच्या माध्यमातून सुमारे १६ हजार बसेस द्वारे दररोज ६६ लाख प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्याची जबाबदारी एसटीवर आहे. गेली कित्येक वर्ष हे कार्य एसटी अगदी इमाने-इतबारे पार पाडत आली असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच तिला महाराष्ट्राची " लोक वाहिनी " असे देखील म्हटले जाते.

  मुंबई, नीता परब: गेली ७३ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वसामान्य नागरिकांना प्रवासी सेवा देणारी एसटी करोना महामारीच्या विळख्याने जबर आर्थिक संकटात सापडली आहे. हे वास्तव स्वीकारून राज्य सरकारने एसटीला भरीव आर्थिक मदत देऊन, या संस्थेचे पुनर्जीवन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेचे हक्काचं वाहन म्हणून एसटी कडे पाहिले जाते. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी – विद्यार्थिनी, ग्रामीण महिला अशा अनेकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचण्यासाठी एसटीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले वाहतुकीचे जाळे पसरले आहे .

  तब्बल ६०९ बसस्थानकाच्या माध्यमातून सुमारे १६ हजार बसेस द्वारे दररोज ६६ लाख प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्याची जबाबदारी एसटीवर आहे. गेली कित्येक वर्ष हे कार्य एसटी अगदी इमाने-इतबारे पार पाडत आली असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच तिला महाराष्ट्राची ” लोक वाहिनी ” असे देखील म्हटले जाते.

  मात्र दुसरीकडे, गेल्या दीड वर्षांमध्ये करोना महामारी च्या पार्श्वभूमीवर एसटीचे पूर्णतः कंबरडेच मोडले आहे. प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद असल्याने एसटीला मिळणाऱ्या हक्काच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे, अन्य महसुलाचे स्त्रोत हे देखील खूप काही कमाई करून मिळत नाहिये. त्यामुळे भविष्यात केवळ प्रवासी तिकिटाच्या महसूल अवलंबून न राहता वेगवेगळे महसूल स्त्रोत शोधून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनन्याकडे एसटी लक्ष केंद्रित करत आहे.

  एसटीची पुढील उद्दिष्ट

  एसटीच्या मोकळ्या जागांचा व्यवसाईक वापर : एसटी महामंडळाची बसस्थानके ही प्रत्येक छोट्या मोठ्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत .किंबहुना बसस्थानकाचा केंद्रीय स्थान हे तेथील व्यापार-उदीम वाढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. याचा व्यवसायिक फायदा होण्यासाठी एसटी महामंडळाची जी बसस्थानके आहेत त्यांच्या मोकळ्या आवारामध्ये वाहतुकीला अडथळा येणार नाही अशी, त्या त्या शहराला अनुकूल अशी व्यापारी संकुले उभी करून त्यांच्या वार्षिक उत्पन्नातून(भाडे तत्वावर) एसटीला चांगला महसूल मिळू शकतो .यासाठी शासनाने एसटीला आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.व्यापारी संकुले वेळेत बांधणी करुन, व्यापारासाठी खुली करणे , त्यासाठी निधीची कमतरता पडू न देणे याची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलली पाहिजे. शासनाने एसटीला दिलेला निधी भविष्यात एसटीच्या उत्पन्नातून शासन परत सुद्धा मिळू शकते.

  धार्मिक पर्यटनाला चालना देणे

  महाराष्ट्र मध्ये धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. यात्रा -जत्रा, उत्सव या व्यतिरिक्त वर्षभर पंढरपूर, तुळजापूर ,अक्कलकोट ,शिर्डी, शेगाव, त्रंबकेश्वर अशा अनेक धार्मिक स्थळांना आपले सर्व सामान्य लोक त्यांच्या सोयीनुसार भेट देत असतात. या लोकांच्यासाठी माफक दरामध्ये प्रवास आणि राहण्याची सोय होईल असे पॅकेज निर्माण करून त्याद्वारे वाहतूक व्यवसाय केल्यास, त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

  मालवाहतुकीचा विस्तार

  गेल्या वर्षभरामध्ये मालवाहतूकी सारख्या वेगळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून एसटीने चांगला महसूल मिळवला आहे .व्यापारी मालवाहतुकीचे क्षेत्र एसटीसाठी भविष्यात नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. पण त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तालुकास्तरावरील आगारामध्ये गोडाऊन, वेअर -हाऊस निर्माण करणे. तेथे मालवाहतूकी संबंधी इतर सोयी सुविधा पुरवणे. या बरोबरच छोट्या छोट्या मालवाहतूकदारांना परवडेल अशी पार्सल व्यवस्था निर्माण करणे, एसटीला अत्यंत आवश्यक आहे. याबरोबरच मालवाहतुकीचे व्यवसायांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालवाहू वाहने जास्त काळ रिकामी राहणार नाहीत,यासारख्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.

  प्रवासीभिमुख सोई

  सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न : गेल्या ७३ वर्षांमध्ये प्रवासी तिकीटातून मिळणारा महसूल हा एसटीचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत राहिला आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार प्रवासीभिमुख सोयीसुविधा निर्माण करून, जास्तीत जास्त प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करणे, ही काळाची गरज आहे. एसटी सारख्या मोठ्या प्रवासी संस्थेकडे असलेले ” कुशल मनुष्यबळ ” हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. याचा योग्य वापर करून प्रवाशांना चांगल्या, दर्जेदार सेवा मिळवून देणे ,त्यासाठी नवनवीन संकल्पना राबवणे, स्वच्छता, टापटीपपणा, सौंदर्यीकरण या सारख्या माध्यमातून प्रवाशांना आकर्षित करणे. स्पर्धात्मक तिकीट दराच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवासी एसटीकडे मिळवणे यासारख्या प्रभावी उपाय योजनांचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एसटीच्या वाहतूक व्यवस्थापनामध्ये व्यवसायिक व स्पर्धात्मक बदल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  सुरक्षित प्रवासी सेवेचा वसा पुढे चालू ठेवणे

  “सुरक्षित प्रवास म्हणजे एसटीचा प्रवास” हे ब्रीद घेऊन एसटीने गेल्या ७३ वर्षांमध्ये सर्व सामान्य प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासाहत्तेचं बीज रोवलं आहे. इतर कोणत्याही प्रवासी वाहनांच्या तुलनेमध्ये एसटीच्या अपघातांची संख्या… आणि त्यामध्ये मनुष्य हानी होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे एसटीसाठी भुषावह असच आहे !पण भविष्यामध्ये आधुनिक सोयीसुविधांच्या बरोबरच प्रवासी वर्गाला सुरक्षित प्रवासाचा अभिवचन देऊन त्यानुसार गतिमान प्रवासाचा आव्हान पेलत आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
  खरंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एसटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे .जात ,धर्म, पंथ ,वर्ग असा कोणताही भेदभाव न करता गेली सात दशके सर्वसामान्य प्रवाशांना आपल्या सुरक्षित प्रवासी सेवेच्या माध्यमातून एसटीने सामाजिक अभिसरणाचे चांगले उदाहरण निर्माण केले आहे. त्यामुळे ही संस्था भविष्यात सक्षमपणे उभी राहणे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुरक्षित व किफायतशीर प्रवास घडवून आणणे हे तितकेच महत्त्वाचे ठरणार असल्याचे अधिकारी सांगतात.