गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी नक्षलींनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान आणि १ खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. त्यावेळी घटनेतील सुत्रधारासह अनेक माओवाद्यांना अटक करण्यात आली होती.

    मुंबई – आपण आधी सामान्य माणूस आहोत, त्यानंतर न्यायमूर्ती आहोत. कायद्याच्या कक्षेत राहून जे काही करता येईल त्याबाबत आम्ही नक्कीच विचार करू,’’ असे मत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील २०१९ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील महिला आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

    गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी नक्षलींनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान आणि १ खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. त्यावेळी घटनेतील सुत्रधारासह अनेक माओवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील महिला आरोपी निर्मला उप्गुगंटी ऊर्फ निर्मला अक्काने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर असून कारागृहातून धर्माशाळेत (शांती अ-वेदना सदन) हलविण्यात यावे, जेणेकरून शेवटच्या दिवसात तिची योग्य प्रकारे सुश्रुषा करण्यात येईल, अशी मागणी याचिकेतून केली आहे.

    त्या याचिकेवर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, उप्पुगंतीचा कॅन्सर अंतिम टप्प्यात असून तो तिच्या संपूर्ण शरीरात पसरला आहे. त्यातच तिला स्तनाचा कॅन्सरही झाला असून तिच्या ह्रद्याची गती मंदावत चालली असल्याचेही अँड. रॉय यांनी खंडपीठाला संगितले. तसेच निर्मलावर अद्यापही केमोथेरपी झालेली नाही, त्यामुळे तिला आता प्रचंड त्रास होत असून कारागृहात फक्त वेदना कमी करण्याचे औषध देत असल्याचेही अँड. रॉय यांनी सांगितले.

    त्याला विरोध करत आरोपीला एकदिवसा आड टाटा रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे सरकारी वकील संगीता शिंदे यांनी सांगत आपला युक्तिवाद संपवला. त्याची दखल घेत तुम्ही आशावादी असायला हवे, तुम्ही आयुष्य मर्यादित का समजता, तुम्ही सतत, अंतिम काही दिवस, असे म्हणू नका, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सांगत खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला.