गडचिरोली जांभूळखेडा बॉम्बसफोट प्रकरण : आरोपीची उच्च न्यायालयात धाव

गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी नक्षलींनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान आणि १ खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. त्यावेळी घटनेतील सुत्रधारासह अनेक माओवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील निर्मला उप्गुगंटी महिला आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

    मुंबई – गडचिरोली जिल्ह्यातील २०१९ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर असून कारागृहातून आजारींना ठेवण्यात येणाऱ्या धर्मशाळेत ठेवण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

    गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी नक्षलींनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान आणि १ खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. त्यावेळी घटनेतील सुत्रधारासह अनेक माओवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील निर्मला उप्गुगंटी महिला आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर असून कारागृहातून धर्माशाळेत हलविण्यात यावे, देणेकरून शेवटच्या दिवसात तिची योग्य प्रकारे सुश्रुषा करण्यात येईल, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.

    त्या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, निर्मलाला चौथ्या टप्प्यातील कॅन्सर असून तो फुफ्फुसांसह इतर अवयवांमध्ये पसरला असल्याचे अँड. युग चौधरी आणि रॉय यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर कारागृहातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्यावतीने अँड. संगिता शिंदे यांनी माहिती दिली.

    मात्र, निर्मलाला भायखळा कारागृहात गर्दी असलेल्या कोठडीत ठेवण्यात येते. तेथे तिला जमिनीवर झोपावे लागते त्यासोबत तिला अत्यावश्यक वैद्यकीय सुविधाही मिळत नसल्याचे अँड. रॉय यांनी सांगितले. त्यावर इतकी गंभीर परिस्थिती असताना जामीनासाठी अर्ज का केला नाही तसेच तुम्ही जामीनाची मागणी केली नाहीतर सुटकेचा आदेश न्यायालयालाही देता येणार नाही असे खंडपीठाने नमूद केले.

    तेव्हा, निर्मलाचा पतीही याच प्रकऱणात सहआरोपी असून तो कोठडीत आहे. बाहेर तिचे कोणीही कुटुंबिय नाही अथवा रहायला जागाही नाही. म्हणून जामीन मागण्यात आला नसल्याचे अँड. रॉय यांनी सांगितले. त्याची दखल घेत न्यायालयाने याचिकेत सुधारणा करून त्यात जामीनाची मागणी समाविष्ट कऱण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. तसेच कारागृह अधिकाऱ्यांना निर्मला यांना टाटा मेमोरियल रुग्णालयात घेऊन जाण्याचे तसेच महिन्याच्या शेवटी तिची वैद्यकीय स्थिती न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.