कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या सुरु,दोन दिवसांमध्ये मिळणार अहवाल

कोरोनाचे बदलते स्वरूप ओळखणाऱ्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ (Genome Sequencing Test)चाचण्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १९६ नमुने टेस्टिंग मशीनमध्ये(Testing Machine) ठेवण्यात आले आहेत.

    मुंबई: गेल्या दीड वर्षापासून कोरोनाशी(Corona) लढा सुरु आहे. कोरोना आपले रुप बदलत आहे. म्युकरमाकोसिस, डेल्टा प्लससारखे(Delta Plus) घातक कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे बदलते स्वरूप ओळखणाऱ्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ (Genome Sequencing Test)चाचण्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १९६ नमुने टेस्टिंग मशीनमध्ये(Testing Machine) ठेवण्यात आले आहेत. दोन दिवसांत त्यांचा अहवाल(Report) मिळणार आहे. या मशिनमुळे वेळीच निदान होऊन वेळेवर उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या बदलत्या नवीन स्ट्रेनच्या आजारांना रोखता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर संपूर्ण मुंबईला कोरोनाने व्यापले. काही दिवसांतच कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला. राज्य सरकार व पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाने आपले रुप बदलले असून नव्या स्ट्रेनचा धोका वाढला आहे. अशा बदललेल्या स्ट्रेनच्या विषाणूची चाचणी करण्यासाठी मुंबईत आतापर्यंत सुविधा नव्हती. त्यामुळे नमुने पुण्याला पाठवावे लागत होते. या चाचण्यांचा अहवाल येण्यास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने आजार पसरण्याचे प्रमाण वाढत होते. याकडे लक्ष वेधून पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात अमेरिकेतून अत्याधुनिक ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ चाचण्यांचे मशीन आणण्यात आले आहे.

    ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचे लोकार्पण करण्यात आले. पालिकेकडे पुरेसा नमुने गोळा झाल्याने आता चाचण्यांना सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या बदलता स्ट्रेन व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीर कोरोनाचे बदलते रुप ओळखणारी जिनोम सिक्वेन्सिंग मशिन उपलब्ध झाल्याने निदान व उपचार करणे सोपे हाेणार असल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य खात्याने दिली आहे.