घाटकोपर अंमलीपदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई; धारावीतुन १ कोटी २० लाखांचे एमडी जप्त

मुंबई शहर अंमलीपदार्थ मुक्त ठेवण्यासाठी अमलीपदार्थविरोधी पथकांनी कारवायांचा धडाका लावून असताना २७ एप्रिल रोजी घाटकोपर अंमलीपदार्थविरोधी पथकाने एमडी हे अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी १ कोटी २० लाख रुपयांचे एमडी जप्त केले आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

  मुंबई : मुंबई शहर अंमलीपदार्थ मुक्त ठेवण्यासाठी अमलीपदार्थविरोधी पथकांनी कारवायांचा धडाका लावून असताना २७ एप्रिल रोजी घाटकोपर अंमलीपदार्थविरोधी पथकाने एमडी हे अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी १ कोटी २० लाख रुपयांचे एमडी जप्त केले आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

  मुंबई शहरात दिवसेंदिवस अंमलीपदार्थ तस्कऱ्यांचे जाळे वाढ आहे. सदर तस्कऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व पोलीस विभागांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमलीपदार्थविरोधी विभागाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलीपदार्थविरोधी पथकांनी विशेष मोहीम हाती घेतली. या शोधमोहिमेचा एक भाग म्हणून घाटकोपर अंमलीपदार्थविरोधी पथक गस्त घालत होते.

  गस्तीवर असताना धारावी परिसरातील अखिल भारतीय कुंचीकुर्वे नगर येथे ३ इसम संशयास्पदरीत्या आढळून आले. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांची अंगझडती घेतली असता १ किलो एमडी आढळून आले. या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १ कोटी २० लाख रुपये किंमत आहे. तसेच चौकशीदरम्यान या तिघांनी स्वत:ची नावे रिजवान खान (३५), जब्बार अब्दुल सत्तार खान (३५), फकरूल्ला अमीर बादशहा शेख (३६) अशी सांगितली.

  दरम्यान, एमडी बाळगल्या प्रकरणी हवालदार शिवाजी कोरवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घाटकोपर अमलीपदार्थविरोधी पथकाने (गु. र. क्र. ३९/२०२१) एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क), २९ नुसार गुन्हा दाखल तिघांनाही अटक केली. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींनी एमडी कोठून आणले? कोणाला विकणार होते? याचा तपास सुरू असल्याचे घाटकोपर अमलीपदार्थविरोधी पथकाने सांगितले.

  सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अपर आयुक्त (गुन्हे) विरेश प्रभू, अंमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चिखले, घाटकोपर अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पावले, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस हवालदार कोरवी, पोलीस हवालदार दरगाडे, पोलीस नाईक चौरे, पोलीस नाईक शेगावकर, पोलीस अंमलदार महाले, पोलीस अंमलदार उबाळे, महिला पोलीस अंमलदार डुंबरे, पोलीस अंमलदार (चालक) जांबे आदी पथकाने केला.

  मुंबईतून अमलीपदार्थ तस्करीचा नायनाट करण्यासाठी अमलीपदार्थविरोधी पथक कायम सतर्क असतात. सुजान नागरिक या नात्याने आपणही सतर्क राहिले पाहिजे. आपल्या आजूबाजूला काेणी अमलीपदार्थांची विक्री अथवा सेवन करत असल्यास त्वरित अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या टोल फ्री क्रमांक ९८१९१११२२२ वर संपर्क साधावा, असे आवाहन अंमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी केले आहे.