मुख्य आरोपी सुनील शितपला जामीन मंजूर, खटला सुरु होण्यास विलंब झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाकडून सशर्त जामीन

सुनील शितपकडून सदर इमारतीतील सदस्यांना धमकावले जात होते. सुनील शितपला आपण करत असलेल्या कृत्याची पूर्ण माहिती होती, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते. शितप यांनी याआधीही मुंबई सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात जमीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. सुनिल शितप यांनी नव्याने जामीनासाठी याचिका दाखल केली होती.

    मुंबई : घाटकोपर येथील सिद्धीसाई ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील प्रमुख आरोपी सुनील शितपला मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीमध्ये जामीन मंजूर केला. सदर प्रकरणात खटला सुरू होण्यास विलंब झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शितप यांना विविध अटी शर्तींसह जामीन दिला.

    घाटकोपर येथे सिद्धीसाई ही चार मजली इमारत २५ जुलै २०१७ रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ११ महिलांचा समावेश होता तर १४ जण जखमी झाले होते. या प्रकरणी सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील शितपप्रमाणेच त्या इमारतीत नूतनीकरणाचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट यांनाही सहआरोपी करण्यात आले होते.

    सुनील शितपकडून सदर इमारतीतील सदस्यांना धमकावले जात होते. सुनील शितपला आपण करत असलेल्या कृत्याची पूर्ण माहिती होती, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते. शितप यांनी याआधीही मुंबई सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात जमीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. सुनिल शितप यांनी नव्याने जामीनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर काही दिवसांपूर्वीच न्या. अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्या आदेशाची प्रत नुकतीच जाहीर करण्यात आली.

    तेव्हा, सदर आजपर्यंत खटल्यात याचिकाकर्त्या आणि सह-आरोपींवर आरोप ठेवण्यासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचे याचिकाकर्त्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचा अर्थ मागील तीन वर्षामध्ये खटल्यावर सुनावणी सुरू झालेली नाही. असे निरीक्षण न्या. गडकरी यांनी आपल्या आदेशात नोंदवले. तसेच कलम ३०४ (ii) अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा १० वर्षे किंवा दंड ठोठावला जातो. याचिकाकर्ता (शितप) सुमारे तीन वर्षांपासून तुरूंगात आहे आणि त्याअंतर्गत कैदी म्हणून त्याने जवळजवळ एक तृतीयांश शिक्षा भोगली असल्याचे आपल्या आदेशात अधोरेखित करत न्यायालयाने शितप यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

    तसेच जामीन मिळाल्यानंतर शितप यांना खटल्या सुरू असेपर्यंत महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते १२ यावेळेत पार्कसाईट पोलीस ठाण्यात हजेरी लावणे अनिवार्य असणार आहे. तसेच आपला पाटपोर्ट पोलिसांकडे जमा करावा लागेल. पोलिसांकडे हजेरी लावण्याशिवाय शितप यांना पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय पुराव्यांशी छेटछाड न करणे आणि साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे अशा विविध अटी शर्तींवर शितप यांना जामीन करण्यात येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

    दुसरीकडे, इमारतीमध्ये रचनात्मक बदल केल्याचा आरोप असलेले इमारतीचे सचिव रणजित आगळे यांनाही सत्र न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.