आमदारांना दिवाळीआधीच ठाकरे सरकारकडून गिफ्ट; स्थानिक विकास निधीत एक कोटी रुपयांची भरघोस वाढ

राज्यातल्या आमदारांना महाविकास आघाडी सरकारने दसऱ्याची भेट दिली असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटी रुपयांची वाढ केली आहे. आता आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

    मुंबई : राज्यातल्या आमदारांना महाविकास आघाडी सरकारने दसऱ्याची भेट दिली असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटी रुपयांची वाढ केली आहे. आता आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

    दरम्यान या निधीतून स्थानिक विकासांची कामे मोठय़ा प्रमाणावर मार्गी लागणार आहेत. गेल्या दीड वर्षापासून राज्यासह देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदारांचा विकास निधी गोठवला आहे. त्यामुळे स्थानिक विकासकामांसाठी खासदारांकडे कोणताही निधी उपलब्ध नाही.

    तर राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक कोटीची वाढ करून तो तीन कोटी करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती, तसेच भकिष्यात या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी वाढ करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आमदारांचा विकास निधी चार कोटी रुपये झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने आज जारी केला आहे.

    शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून या निर्णयामुळे अधिक विकासकामे मार्गी लागण्यास मदत होईल. विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेतील 62 अशा एकूण 350 आमदारांना 350 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व आमदारांना मिळून आता प्रत्येक वर्षी एकूण 1400 कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळेल.

    राज्याच्या इतिहासातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील वाढीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक कोटीचा निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगी राज्य सरकारने दिली होती.