स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक

पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, अशी मागणीही सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे केली आहे.

    मुंबई : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलताना चांगलेचं आक्रमक झाले होते. पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

    तसेच स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, अशी मागणीही सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे केली आहे. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही याचाच अर्थ काँग्रेसला काहीच किंमत नाही, सत्तेसाठी काँग्रेस काहीही करू शकते, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    दरम्यान, सभागृहाचं कामकाज सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.