Global Teacher Award honors India -Filling Guardian Minister Dattatraya Going home, Shri. Disley's parents honored

मुंबई : जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होतो ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असून  रणजितसिंह डिसले यापुढील काळातही आपल्या कार्यकुशलतेने देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन देशाची मान उंचावतील, असा विश्वास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्तरावरील ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक डिसले यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त पालकमंत्री भरणे यांनी काल बार्शी येथे रणजीतसिंह डिसले यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह कुटुंबीयांचा व त्यांच्या आईवडीलांचा सन्मान केला.

डिसले यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण मिळावे हा ध्यास घेऊन ज्ञानदानाचे काम केल्यामुळे त्यांची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी ‘क्यू-आर’ कोड सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अवलंब केला. आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत उच्च स्तरावर असल्याचेच यातून दिसून येते. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण अधिक दर्जेदार होण्यासाठी डिसले यांच्या नवनवीन प्रयोगांचा अवलंब राज्यभरात करण्यात येईल असे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले असल्याचे भरणे यावेळी म्हणाले.

या पुरस्कारातील अर्धी रक्कम अन्य नामांकन झालेल्या शिक्षकांमध्ये वाटून देण्याचा आणि ती शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करण्याचा त्यांचा निर्णय हा त्यांचे शिक्षणाप्रती समर्पण दाखवून देते, असे म्हणत  भरणे यांनी डिसलेंच्या कार्याचे कौतुक केले.