मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; पाणी टंचाई टळणार

आता पर्यंत तलाव क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. मात्र सर्वच तलावांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस पडू लागल्याने तलावांच्या पातळीत...

  जलसाठ्यात 28.68 टक्के वाढ
  तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस

  मुंबई, मुंबईला (mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून सातही तलावांमध्ये 28.68 टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टाळण्याची शक्यता आहे.

  मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाने काल तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार एन्ट्री केली. मध्य वैतरणा धरण क्षेत्रात 306 मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्या खालोखाल तानसा 293 मिलिमीटर, मोडकसगर 269 मिलिमीटर, अप्पर वैतरणा 155 मिलिमीटर, भातसा 201 मिलिमीटर इतका पाऊस पडला, त्यामुळे तलावांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत.

  आता पर्यंत तलाव क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. मात्र सर्वच तलावांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस पडू लागल्याने तलावांच्या पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. कालच्या पावसाने 33 दिवसांचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती पालिकेच्या जलाभियंता विभागाने दिली.

  तलाव क्षेत्रात पावसाची दमदार सुरुवात झाल्यामुळे पाणी टंचाईची चिंता मिटण्याची दाट शक्यता आहे.