गोस्वामींना पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राइकची पूर्वकल्पना होती; अर्णबविरोधात धक्कादायक पुरावा

टीआरपी घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अर्णब गोस्वामीला पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राइकची पूर्वकल्पना होती अशी खळबळजनक माहिती पोलिस तापासातून समोर आली आहे. टीआरपी घोटाळ्याबाबत मुंबई पोलिस सातत्याने तपास करत आहेत, आणि त्यातूनच नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

मुंबई : टीआरपी घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अर्णब गोस्वामीला पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राइकची पूर्वकल्पना होती अशी खळबळजनक माहिती पोलिस तापासातून समोर आली आहे. टीआरपी घोटाळ्याबाबत मुंबई पोलिस सातत्याने तपास करत आहेत, आणि त्यातूनच नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांचं व्हॉट्सअप चॅट समोर आलेत. यामुळे अर्णब गोस्वामी अडचणीत सापडलेत. या कथित संवादातून अर्णब गोस्वामीला पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येत आहे.

टीआरपी घोटाळाप्रकरणी क्राईम बँचने ३६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल केले आहे. त्यातील ५०० पाने ही गोस्वामी आणि गुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉटस्ऍप संवादाची असल्याचे समजते. सोशल मीडियावर या संवादातील लीक झालेल्या माहितीमधून गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय व केंद्र सरकारमधील काही सदस्यांसोबत जवळीक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढविण्यासाठी अर्णबने केंद्र सरकारमधील काही उच्चपदस्थांची मदत घेतली असल्याचेही उघडकीस आले आहे. त्याबदल्यात भाजपला प्रसिद्धिच्या माध्यमातून ताकद देण्याचा प्रयत्न केला जात होता? असा संशय देखील व्यक्त केला जात आहे.
गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील संभाषणातून हे उघड होत असल्याचा दावाही केला जात आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंत्यंत संवेदनशील विषय असणाऱया पुलवामा हल्ला व एअर स्ट्राईकच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती व्हॉटस्ऍप चॅटमधून पुढे आली आहे. पुलवामा हल्ल्याच्या चार दिवस आधी तर बालाकोट एअर स्ट्राईक संदर्भात तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामीला माहिती होती. दासगुप्ता यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्यावेळी काहीतरी मोठे घडणार असल्याचा उल्लेख केला आहे. यातूनच याची अर्णबला पूर्व कल्पना होती असे दिसत आहे.

टीआरपी घोटाळ्यात भाजप आणि केंद्र सरकारचादेखील हात आहे. या प्रकरणात भाजपनं स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.