महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करते, पडळकरांचा गंभीर आरोप

गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

मुंबई : धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाच्या परिसरात खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकर यांना आंदोलन करण्यास मदत केली.

गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिले होते. धनगरांसाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. यशवंत महामेश योजनाही राज्य सरकारने रद्द केली. हे सरकार धनगर, भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोपही पडळकरांनी केला आहे. सरकारला जागे करण्यासाठी धनगरी पेहराव परिधान करुन, ढोल वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हा पेहराव आणि ढोल म्हणजे आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे. पण या अस्तिस्वाशी खेळ करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका पडळकरांनी केली