वाझेंना वाचवण्यासाठी सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली : चंद्रकांत पाटील

निल देशमुखांनी वसुली करण्यासाठी सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू केले होते. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शरद पवार यांना सुद्धा दिली होती, त्यासंदर्भात त्यांनी काय केले? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये वसुलीचं टाग्रेट दिलं, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणावरुन मोठा गदारोळ केला होता. त्यामुळे राज्य सरकारने सचिन वाझेंची बदली केली होती. याचं पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

    दरम्यान अनिल देशमुखांनी वसुली करण्यासाठी सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू केले होते. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शरद पवार यांना सुद्धा दिली होती, त्यासंदर्भात त्यांनी काय केले? असा सवाल करत मागील एक वर्षांपासून हा तमाशा सुरू आहे. तसेच, सचिन वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष चांगलेचं आक्रमक झाले आहेत. भाजपचे नते नारायण राणे यांनी थेट मुखयमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रोज नवनवीन खुलासे करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.