सरकारचा दट्ट्या, सांगताही येईना अन् करण्याचीही सक्ती; दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना चाचणीच्या वैधतेमुळे शिक्षक तणावाखाली

दर दोन दिवसांनी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. चाचणीच्या अहवालासाठी एक दिवस लागत असल्याने पर्यवेक्षकांना परीक्षेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे परीक्षेसाठी पर्यवेक्षकांचे नियोजन करणे शाळांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

    मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. २३ व २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अनुक्रमे दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही चाचणी ४८ तासांसाठीच वैध राहणार आहे.

    त्यामुळे दर दोन दिवसांनी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. चाचणीच्या अहवालासाठी एक दिवस लागत असल्याने पर्यवेक्षकांना परीक्षेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे परीक्षेसाठी पर्यवेक्षकांचे नियोजन करणे शाळांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

    कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून राज्यामध्ये कडक निर्बंध लादले आहेत. याचा फटका अनेक क्षेत्रांना बसणार असला तरी महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    परीक्षेला पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या शिक्षकांना लस घेणे किंवा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. या चाचणीचा अहवाल फक्त ४८ तासांसाठीच वैध राहणार असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे. याच नियमाचा फटका दहावी, बारावीच्या परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी शिक्षकांना दर दोन दिवसांनी रुग्णालयामध्ये फऱ्या माराव्या लागणार आहेत. त्यामुळे वारंवार रुग्णालयात गेल्याने कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन कोरोनाची लागण होण्याची शक्यता काही शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच कोराना चाचणीचा अहवाल येण्यास एक दिवस लागत असल्याने शिक्षकांना त्या दिवशी परीक्षा केंद्रावर हजर राहता येणार नाही. त्यामुळे परीक्षेवेळी एकीकडे शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

    तर दुसरीकडे ज्या दिवशी शिक्षकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने पर्यायी शिक्षक उपलब्ध करण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत नसल्यामुळे वारंवार आमची चाचणी करण्यात येईल का? याबाबत शिक्षकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे.