‘राज्यपाल हे सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती, अशा हत्तींचे माहुत दिल्लीत’

उत्तर प्रदेशच्या रेवा जिल्हय़ातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व साकीनाक्यातील घटना यात काय फरक आहे? दोन्ही घटनांत महिलांचेच बळी गेले, पण हंगामा फक्त महाराष्ट्रात होतोय. फरक असा आहे की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही व इतर दोन राज्यांत भाजपची सरकारे आहेत. त्यामुळे तेथे साधू-संतांचे मृत्यू झाले काय आणि मुलींवर अत्याचार झाले काय? कोणास काय फरक पडतोय!

    गेल्या दीड वर्षापासून महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल यांच्यात या ना त्या कारणावरुन सातत्याने संघर्ष होताना दिसून येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा लेटर वॉर (Letter war) सुरू झालं आहे. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं असं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे (CM Uddhav Thackeray) पाठवले आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून या पत्राला खरमरीत उत्तर देण्यात आलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांना इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा इशारावजा धमकीच देण्यात आलीय.

    काय म्हटलंय सामनात

    राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात. केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका.

    महाराष्ट्रातील भाजपचे महिला महामंडळही महिलांवरील अन्याय-अत्याचाराबाबत इतके आक्रमक आहे की, न्यायासाठी ते राजभवनात ठाण मांडून बसले आहे. असे जागरूक महिला महामंडळ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात नसावे याची खंत कुणास वाटू नये? रेवा जिल्हय़ातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व साकीनाक्यातील घटना यात काय फरक आहे? दोन्ही घटनांत महिलांचेच बळी गेले, पण हंगामा फक्त महाराष्ट्रात होतोय. फरक असा आहे की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही व इतर दोन राज्यांत भाजपची सरकारे आहेत. त्यामुळे तेथे साधू-संतांचे मृत्यू झाले काय आणि मुलींवर अत्याचार झाले काय? कोणास काय फरक पडतोय!