कोरोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची राज्यपालांची सूचना

सैन्य दलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

    मुंबई :  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल दोन वेगवेगळ्या दूरदृश्य कार्यक्रमात मार्गदर्शन केले. त्यात सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका बैठकीच्या वेळी केली. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांच्यासोबत राज्यपालांनी (दि. २७) दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली.

    सैन्य दलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपालांची रेड क्रॉस संस्थेला सूचना

    कोरोनाच्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रेड क्रॉस संस्थेने अधिक सक्रियतेने काम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मास्क वाटप, कोरोनाविषयक जनजागृती, लसीकरण आदी कार्यात रेड क्रॉस संस्थेने सहभागी होण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे महासचिव तेहमुरस्प सकलोथ यांनी संस्थेतर्फे राज्यात केल्या जात असलेल्या कार्याची राज्यपालांना माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष होमी खुस्रोखान हे देखील यावेळी उपस्थित होते.