कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याबाबतच शासन निर्णय लवकरच : प्रा वर्षा गायकवाड

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, तेथील परिस्थिती पाहून १०-१२ वी वर्ग सुरू करण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

    मुंबई: कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ज्या मुलांचे दोन्ही पालक गमावले आहेत.  त्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आग्रही आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

    निर्णय होऊन जीआर निघण्याची दाट शक्यता
    शालेय शिक्षण विभागाला या निर्णयासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आवश्यक निधीसह सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय होऊन जीआर निघण्याची दाट शक्यता असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

    शाळा सुरू करण्याबाबत सध्या तरी निर्णय नाही
    राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, तेथील परिस्थिती पाहून १०-१२ वी वर्ग सुरू करण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. पुढील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात १० वी आणि १२ वीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता सरकारकडून योग्य त्या योजना आखण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे येत्या काळात शाळा सुरू होणार नाहीत, असे संकेत वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.