आजोबांनी IPL मध्ये चिअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो; निलेश राणेंची टीका

भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. “आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटर केली आहे.

  मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना सेंटरमधील नृत्यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. याच पार्श्वभूमीवर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. “आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटर केली आहे.

  आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतात की, “आजोबांनी आयपीएल आणून चिअरलीडर्स नाचवल्या. नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय. वर स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की, मी नेहमी सेंटरमध्ये जाऊन नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं 2024 पर्यंत नाचून घ्या”, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.

  प्रवीण दरेकर यांचीही टीका

  प्रवीण दरेकर यांनीही रोहित पवारांवर टीका केली होती. प्रवीण दरेकर म्हणाले होते की, “रोहित पवार यांनी एका कोव्हिड सेंटरवर जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला असून तो निषेधार्ह आहे. सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि शरद पवारांचे नातू म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?”, असा सवालही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता.

  दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्यूत्तर

  तर प्रवीण दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले होते की, “सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब, कोविडमुळे खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळे धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटे सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे.”