MPSC च्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा…

विद्यार्थीं आपल्यासोबत असणार परीक्षेचं प्रवेशपत्र हे लोकल प्रवासाचा पास म्हणून वापरू शकतात. मात्र, कोरोना नियमांचे पालन या विद्यार्थ्यांना करावे लागेल.

    मुंबई: उद्या (४ सप्टेंबर) रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची(MPSC) परीक्षा होणार आहे. या संयुक्त पुर्व परीक्षेसाठी मुंबईमध्ये परीक्षा बसणाऱ्या परिक्षार्थींंची संख्या ही जास्त आहे. परिणामी या विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय करण्यात आली आहे. ज्या विदयार्थ्यांचं परीक्षा केंद्र हे मुंबईत( Mumbai Examination Center) आहे. त्या ठिकाणी उमेदवारांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने यासंबंधी पत्र जाहीर केले आहे.

    राज्य सरकारने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन रेल्वेला(Railway) पत्र लिहीले होते. आता या पत्राला रेल्वे विभागाने मान्यता दिली आहे. विद्यार्थीं आपल्यासोबत असणार परीक्षेचं प्रवेशपत्र हे लोकल प्रवासाचा पास(Local Train) म्हणून वापरू शकतात. मात्र, कोरोना नियमांचे पालन या विद्यार्थ्यांना करावे लागेल. शिवाय लोकलने प्रवास करताना आपले खरे ओळखपत्र देखील सोबत ठेवावे लागेल.

    संयुक्त पुर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या परीक्षास्थळी वेळेवर पोहचता यावे यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. मोठ्या कालावधीने होत असलेल्या या परीक्षेला राज्यभरातून हजारो विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांना सरकारने आणि रेल्वे विभागाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून यासाठी राज्यसरकारकडून योग्य ती खबरदारी घेत परीक्षा केंद्र खुली करण्यात आली आहेत.