आरटीई प्रवेशाला उत्तम प्रतिसाद !  मुंबईत सहा वर्षांच्या तुलनेत यंदा प्रवेश वाढले

आरटीई कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा मध्यमवर्गीय आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या प्रवेशासाठी शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते.

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला यंदा मुंबईतील पालकांचा माेठा प्रतिसाद मिळाला आहे. मागील सहा वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेशामध्ये वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवेश प्रकियेबाबत जनजागृतीमुळे आरटीई प्रवेशाला प्रतिसाद वाढला आहे.
आरटीई कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा मध्यमवर्गीय आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या प्रवेशासाठी शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा कोरोनामुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती. आता प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार मुंबई विभागात ३ हजार ८२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे गेल्या काही वर्षांपासून पालकांची आवड वाढू लागली असल्याचे बाेलले जात आहे. त्यानुसार यंदा मागील सहा वर्षीच्या तुलनेत आरटीई प्रवेशाची संख्या वाढली आहे.

आकडेवारी काय सांगते...
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये १ हजार ६९ विद्यार्थ्यांनी आरटीईनुसार प्रवेश निश्‍चित केले होते. २०१५-१६ मध्ये १ हजार ६८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर २०१६-१७ मध्ये २ हजार ५०६, २०१७-१८ मध्ये २ हजार ७९८, २०१८-१९ या वर्षात ३ हजार २३३ आणि २०१९-२० या वर्षात ३ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. यंदा कोरोनाची परिस्थिती असतानाही प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. यंदा ३ हजार ८२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. मागील सहा वर्षांच्या तुलनेत प्रवेशात वाढ झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा पालकांचा प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. आरटीई प्रवेशाची जनजागृती करण्यात आली हाेती. कागदपत्र पडताळणीमध्ये सुसुत्रता आणण्यात आली. याबरोबरच कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा काही पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश आरटीईअंतर्गत केले आहेत.
– महेश पालकर – शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका