कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असं सुप्रिया सुळे ट्विटरवर म्हणाल्या आहेत.

मुंबई:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये राज्यात अनेक प्रकराच्या गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. दुकाने, कंपन्या आणि राज्यांतर्गत एसटी बस सेवाही आजपासून सुरू होत आहे. मात्र, जीम अजूनही बंद आहेत. त्यामुळे जीम चालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील जीम उघडण्याची मागणी केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असं सुप्रिया सुळे ट्विटरवर म्हणाल्या आहेत. 

राज ठाकरे यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती. आज राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जीम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्देवी आहे, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले होते.  आता सुप्रिया सुळे यांनीही  ट्वीटरच्या माध्यमातून जीम चालकांची, व्यायामपटूंची आणि प्रशिक्षकांची व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. तसेच मुंबईतील एका जीम चालकानं लिहिलेलं पत्रही त्यांनी ट्वीट केलं आहे.

अद्यापही लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ह्या क्षेत्राशी संबंधित सर्वांवरच बिकट आर्थिक परिस्थिती ओढावली आहे. लॉकडाऊन असले तरी जागामालक भाड्यासाठी, बँकवाले हप्त्यांसाठी, शाळाचालक मुलांच्या फीसाठी तगादा लावत आहेत. पाणी बिल, वीज बिल भरावेच लागत आहे. आतापर्यंत जेवढी बचत होती तीही संपली आहे. त्यामुळं जीमचे चालक, मालक, प्रशिक्षकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की, सरकारच्या ज्या काही अटी व नियम असतील, ते लागू करून जिम उघडण्याची परवानगी द्यावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.