hancoc bridge

हिमालय पूल आणि रखडलेला हँकाँक पूलाच्या(himalaya and hancoc bridge) बांधकामाची प्रक्रिया सुरु झाली असून नवीन वर्षात मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.

मुंबई: हिमालय पूल आणि रखडलेला हँकाँक पूलाच्या(himalaya and hancoc bridge) बांधकामाची प्रक्रिया सुरु झाली असून नवीन वर्षात मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. हे दोन्ही पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हिमालय पूल १४ मार्च २०१९ रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेत ३२ जण गंभीर जखमीही झाले होते. विशेष म्हणजे संबंधित पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई याने ब्रीज ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल देऊनही हा ब्रीज कोसळला. त्यामुळे संबंधित देसाई स्ट्रक्चरल ऑडिटरवर कारवाई करून पालिकेकडून मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि अतिधोकादायक पुलांची नव्याने उभारणी करण्याचा निर्णय घेतला.

तसेच सँडहर्स्ट रोड, कर्नाक बंदर जवळचा ब्रिटीश कालीन हँकॉक पूल धोकादायक झाल्याने हा पूल पाडून नवीन पूल उभारला जात आहे. या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. हँकॉक पूल हा १३५ वर्षे जुना व त्यावरील सततच्या रहदारीमुळे हा पूल असुरक्षित असल्याचे रेल्वे व पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. या पुलाच्या पुनर्बांधणी करण्यासाठी या पुलाचे पाडकाम जानेवारी २०१६ साली करण्यात आले. मात्र त्याजागी पर्यायी नवीन पूल उभारण्याबाबत योग्य नियोजन न झाल्याने या पुलाचे काम रखडले होते.

यातच या पुलाच्या कंत्राटकामाचा वादही समोर आला. पुढे या पुलाचे प्रकरण न्यायालयात गेले. पूल पाडल्यानंतर अद्याप पर्यायी व्यवस्था न केल्याने या पुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. २०१८ मध्ये हे काम देण्यात आले. १९ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नसल्याने येथील रहिवासी, प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काम रखडल्याने खर्चही वाढला. आवश्यक परवानग्या मिळाल्याने पुलाच्या कामाला वेग येणार आहे.

हिमालय पुलासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून नवीन वर्षात एप्रिल नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन पुढील सहा महिन्यात हे काम पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. हिमालय पुलाच्या बांधकामासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे नवीन पूल अधिक बळकट, भक्कम होणार आहे. स्टेनलेस स्टीलमुळे पूल गंजण्याचा धोका संपुष्टात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पूल अधिकाधिक मजबूत राहील, तशी पुलाची रचना राहील, असे मुंबई महापालिकेचे पूल विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्रकुमार तळकर यांनी सांगितले.

हँकाँक पूलाचे काम मे पर्यंत पूर्ण होणार
हिमालय पुलापाठोपाठ हँकाँक पूलदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. या पुलासाठीचा पहिला गर्डर यापूर्वीच बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या गर्डरचीही तयारी सुरू आहे. सद्यस्थितीत या पुलाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे काम २०१६ मध्ये पाडण्यात आलेला हा पूल मे २०२१ पर्यंत पूर्ण करून प्रवांशांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.