आरोग्य विभागाचा खुलासा; महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये लक्षणीय वाढ नाही

महाराष्ट्रात सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    मुंबई : महाराष्ट्रात सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

    राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसर्‍या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

    एप्रिल २०२१ मध्ये राज्यामध्ये ७७ हजार ३४४ रुग्ण आढळले यामध्ये शून्य ते १८ वर्षे वयोगटात ७६०७ रुग्ण होते. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ९.८३ टक्के इतके होते. त्याचप्रमाणे मे महिन्यामध्ये राज्यामध्ये ८० हजार ७८५ कोरोना रुग्ण होते. यामध्ये शून्य ते १८ वर्षे वयोगटात ९४१६ रुग्ण होते. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ११.६५ टक्के इतके होते. यावरून १८ वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.