मुंबई, ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार हजेरी

मुंबई : रविवारची सुटी संपवून ऑफिसच्या तयारीत असलेल्या मुंबईकरांना घड्याळाच्या अलार्मऐवजी ढगांच्या गडगडाटानं जाग आली. गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाचं सोमवारी पहाटेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पुनरागमन झालं. एरवी शांत संयमानं बसणारा पाऊस यावेळी विजांच्या कडकडासह दाखल झाला. त्यामुळे काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांची पहाटेच्या गारव्यानं सुटका केली.

जुलै-ऑगस्टमध्ये मुंबईसह राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मागील पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पावसाने दडी मारताच राज्यातील तापमानात वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील नागरिक गर्मीने त्रस्त झाले होते.

दरम्यान, रविवारी उकाड्यात प्रचंड वाढ झाल्यानंतर सोमवारी पहाटे पावसाने मुंबईत पाऊल ठेवलं. पहाटे पाच साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता. त्यानंतर मात्र, वाढतच गेला.

तापमानात अचानक वाढ

राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळला. या कालावधीत अगदी तुरळक ठिकाणीच दिवसाचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचं दिसून आलं होतं. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काही तुरळक भाग वगळता राज्यात सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या आसपास आणि ३० अंशांच्या खाली होते. कमी-अधिक प्रमाणात पाऊस असल्याने रात्रीचे किमान तापमानही सरासरीच्या आसपास होते. त्यामुळे वातावरणात गारवा होता. मात्र, पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यापासून तापमानात झपाट्याने वाढ सुरू झाली होती. एकाच आठवड्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आदी शहरांच्या कमाल तापमानात तब्बल ५ ते ६ अंशांनी वाढ नोंदविली गेली.