मुंबईत पावसाचा कहर, त्यात लोकलला आली लहर आणि नेहमीप्रमाणेच झाली मुंबईची तुंबई

अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला असून याव्यतिरिक्त गांधी मार्केट, चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, वडाळा, वांद्रे, सांताक्रुझ परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

  गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत काल रात्रीपासून थांबून थांबून पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन पूर्व आणि हिंदमाता परिसरात पाणी साचलं असून या भागाला नदीचे स्वरूप आले आहे.

  अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला असून याव्यतिरिक्त गांधी मार्केट, चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, वडाळा, वांद्रे, सांताक्रुझ परिसरातही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

  लोकल ठप्प, पावसाने केली रेल्वे प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल

  रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची लाइफलाइन असेलेली लोकल ट्रेन ठप्प झाली असून या पावसाने रेल्वे प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे.

  रेल्वे प्रशासनाने या पावसाळ्यात दावा केला होता की विविध ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लोकलच्या ट्रॅकवर पाणी येणार नाही. पण प्रशासनाचा हा दावा एकाच पावसाळ्यात तीन वेळा फोल ठरला आहे.

  कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे हर्बर आणि सेंट्रल मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली आहे. त्यात भर म्हणजे रेल्वेची अनाउंसमेंट सिस्टममध्ये बिघाड झाल्याने लोक ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या दाव्या प्रतिदाव्यांच्या खेळात सामान्य लोकांच्या जिवाशी खेळ होतोय.

  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात पहाटे पासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार झोडपायला सरुवात केली असून, रात्री पावसाने उसंत दिल्याने राजापूर कोदवली नदीला आलेला पूर ओसरला होता. त्यामुळे राजापुर बाजार पेठेचा धोका टळला होता. जिल्ह्यातील सर्वच नद्या पूर्वपदावर वाहत होत्या परंतु पहाटे पासून कोसळणार्‍या पावसामुळे पुन्हा आज दिवसभरात परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.