मुंबईत जोरदार पाऊस सुरु, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प…

मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

    मुंबई : मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

    दरम्यान सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

    गेल्या दोन ते तीन तासांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

    राज्यात पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज

    हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.