राज्यात आगामी 5 दिवस मुसळधार पाऊस, पुण्यात काय असणार परिस्थिती? : जाणून घ्या सविस्तर

मान्सूनने ऑगस्टमध्ये राज्याच्या बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगाम अडचणीत सापडला असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवड्यात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

    मुंबई : मान्सूनने ऑगस्टमध्ये राज्याच्या बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगाम अडचणीत सापडला असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवड्यात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

    राज्यातील ‘या’ भागात पावसाचे संकेत

    मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात चांगल्या पावसाचे संकेतही देण्यात आले असून कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यंदाच्या मान्सूनचे हंगामाचे वैशिष्टय म्हणजे कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस, सातत्याने पडणारा खंड आणि असमान वातावरण. ऑगस्टमध्ये तर पाऊस झाला नाही. मात्र आता हंगामाच्या शेवटच्या कालावधीत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

    दरम्यान पुढील दोन आठवड्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
    त्यानुसार २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. तर दुसऱ्या आठवड्यात ३ ते ९ सप्टेंबर या दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    पुण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

    पुणेकरांना शुक्रवारी श्रावणसरी अनुभवायला मिळाल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहणार असले तरीही पावसाच्या हलक्या सरी पडतील. या तीन दिवसांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता 51 ते 75 टक्के असल्याचे हवामान विभागाने सांगितले.