मुसळधार पावसात मुंबईत गुडघाभर पाणी साचणारच : महापौरांचा दावा

पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तासनतास काम करीत आहेत. पालिकेने यंत्रणा उभारल्याने पावसाच्य़ा पाण्याचा निचरा काही वेळातच होत असल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

    मुंबई – मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यावर सखल भागात गुडघाभर पाणी साचते आहे. पूर्वी पाच फूट पाणी तुंबायचे, मात्र महापालिकेच्या सक्षम यंत्रणेमुळे काही वेळातच पाण्याचा निचरा होत आहे. पूर्वीपेक्षा आता परिस्थिती सुधारली असल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मुंबईत आज पडलेल्या मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. याबाबत महापौर बोलत होत्या.

    मुंबई आणि उपनगरांत पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. काही वेळ पाऊस पडला तरी मुंबई तुंबते. त्यामुळे १०० टक्के नालेसफाईचे दावे फोल ठरत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च करून पालिकेने पंपिंग स्टेशन उभारले आहे. ब्रिमस्टोव्ह प्रकल्प आदी प्रकल्प उभारण्यात आले असतानाही पाणी तुंबण्याची समस्या कायम आहे.

    याबाबत बोलताना महापौर म्हणाल्या, यापूर्वी मुसळधार पावसांत पाणी ५ फूट साचत होते, आता गुडघाभर साचत आहे. साचलेल्या पाण्याचा काही वेळातच निचरा होत आहे. आम्ही पाणी साचणार नाही असे कधी म्हटले नाही. पालिकेने हिंदमाता आदी ठिकाणी पाणी साचू नये म्हणून कामे केली आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत आहे. पूर्वीपेक्षा आता पाणी तुंबण्याची स्थिती सुधारते आहे, असे महापौरांनी सांगितले.

    पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तासनतास काम करीत आहेत. पालिकेने यंत्रणा उभारल्याने पावसाच्य़ा पाण्याचा निचरा काही वेळातच होत असल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.