माजी आयआयटीयन्सकडून कोरोनाविषयक मदतीसाठी ”हेल्पनाऊ” संकेतस्थळ

मुंबई :कोरोना रुग्णांची चाचणी करणे सहज शक्य व्हावे यासाठी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यानी कोव्हीड १९ टेस्ट बस बनवल्यानंतर आता कोरोनाग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिका आणि अन्य सुविधा उपलब्ध

मुंबई : कोरोना रुग्णांची चाचणी करणे सहज शक्य व्हावे यासाठी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यानी कोव्हीड १९ टेस्ट बस बनवल्यानंतर आता कोरोनाग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिका आणि अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयआयटी मुंबईच्या आजी, माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन ‘हेल्पनाऊ’ ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून विविध योजना राबवण्यात येत असताना आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनीही यात पुढाकार घेत कोरोनाग्रस्तांची चाचणी करण्यासाठी कोव्हीड १९ टेस्ट बस सुरू केली होती. परंतु कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी १२ तास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या आजी व माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन कोरोना रुग्णांना सहज रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी ‘हेल्पनाऊ’ ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. 
 
‘हेल्पनाऊ’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी ८८९९८८९९५२ या क्रमांकावर रुग्णाने किंवा त्यांच्या नातेवाईकाने संपर्क साधल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये मुंबईमध्ये कोठेही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरू असणार आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णवाहिका सहज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ‘हेल्पनाऊ’कडून पुरवण्यात येणारी रुग्णवाहिका ही निर्जंतुक केलेली आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी असणार आहे. या सुविधेचा लाभ कोरोना रूग्णांसह, आरोग्य कर्मचारी, हॉस्पिटल, कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा आणि सरकारी आस्थापने घेऊ शकतात, अशी माहिती आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आली. 
 
यापूर्वी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यानी पूर्णतः भारतीय बनावटीची कोव्हीड १९ टेस्ट बस बनवली होती. या बसमध्ये असलेल्या जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय स्वब नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजीची सुविधा आहेत. ही बस आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांकडून मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आली असल्याने झोपडपट्टी परिसरात जाऊन रूग्णांची तपासणी करणे, त्यांचे स्वाब घेण्यास मदत होत आहे.