अहो राऊत, तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात?; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी सामनामध्ये अग्रलेख लिहित मुंबई जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, असं म्हटलं होतं. दरम्यान राऊतांच्या या अग्रलेखावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

    मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी सामनामध्ये अग्रलेख लिहित मुंबई जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, असं म्हटलं होतं. दरम्यान राऊतांच्या या अग्रलेखावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीचं उदाहरण आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

    नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?

    मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरेंना विचारायचंय की, तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेवा- दाव्यांसाठी करता आहात. अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.

    अहो राऊत, एका महिलेवरती अत्याचार होऊन तिचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तुम्ही त्या महिलेला राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरून महाराष्ट्राची आणि उत्तर प्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झाला आहे. तुम्ही फक्त भावनिक गप्पा झोडता आणि त्यानंतर ताई तुम्ही घाबरू नका, हल्लेखोरांना शिक्षा होईल सांगत भावनिक भुरळ घालता, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

    सर्व धडपड कोणाला वाचवण्यासाठी आहे?

    दरम्यान, संजय राऊत तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात, घटनेचा तपास पुर्ण होण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या अग्रलेखात अत्याचार करणारा एकच नराधम होता, असं सांगून टाकता. तुमची ही सर्व धडपड कोणाला वाचवण्यासाठी आहे? की ही विकृती आहे? अशा तालिबानी प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या तुम्ही मुसक्या आवळणार आहेत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी रश्मी ठाकरे यांना केला आहे.