मुंबईत हाय अलर्ट जारी; पोलीस बंदोबस्त वाढवला

मुंबई – मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांत देखील सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडल्यामुळे मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवार दुपारपर्यंत झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. 

 सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच येत्या २४  तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मुंबई आणि काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून बुधवारीही मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान शास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.