कोरोना काळात काही जण देवदूतासारखे वावरतात,त्यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीची शहानिशा होते का ? उच्च न्यायालयाचा सवाल

कोरोनाच्या(Corona) संकटात काहीजण देवदूत असल्यासारखे वावरतात. अशा लोकांवर सरकारने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे, अशा शब्दात खंडपीठाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले.

    मुंबई: कोरोना(Corona) काळात समाज माध्यमांवर सेलिब्रेटींशी संपर्क साधून त्यांच्याकडून थेट गरजूंना औषध पुरवठा करण्यात येतो. त्याबाबत बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

    सेलिब्रिटींकडून(Help By Celebrity) मिळणाऱ्या मदतीची शहनिशा करण्यात येते का ? मिळणारी औषधे योग्य मार्गाने मिळविण्यात आली आहेत का? तसेच ती बनावट तर नाहीत ना, त्याबाबत खातरजमा करण्यात येते का? असे प्रश्न उपस्थित करत कोरोनाच्या संकटात काहीजण देवदूत असल्यासारखे वावरतात. अशा लोकांवर सरकारने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे, अशा शब्दात खंडपीठाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा आणि काळी बुरशी अशा समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांनी अ‍ॅड. अर्शिल शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर बुधवारी न्या. एस. पी. देशमुख आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    मागील सुनावणीदरम्यान आमदार झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूदने सोशल मिडियाच्या माध्यमातून गरजूंना रेमडिसीविर औषधांची मदत केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर झिशान सिद्दीकीकडून बीडीआर या ट्रस्टमार्फत औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. त्या ट्रस्टच्या विश्वस्त धीर शहा यांच्याविरोधात अवैधरित्या औषधांचा पुरवठ्या केल्याप्रकरणी माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार करण्यात आली आहे. तसेच ट्रस्टला रेमडेसिवीरचा पुरवणाऱ्या बीडीआर फार्मास्युटिकल्सच्या चार संचालकांविरोधातही फौजदारी तक्रार दाखल केली असल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली. मात्र, सिद्दीकीविरोधात तूर्तास कोणतीही कारवाई कऱण्यात आली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    दुसरीकडे, अभिनेता सोनू सुदला एका साखळीमार्फत औषध पुरवठा करण्यात आला होता. त्यातील शेवटचा दुवा हे गोरेगावमधील लाईफलाईन मेडिकल केअर रुग्णालयातील दुकान आहे. त्यांना सिप्ला कंपनीच्या भिवंडी गोदामातून हा साठा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा साठा सरकारच्या अपरोक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असून त्याची चौकशी सुरू असल्याचेही कुंभकोणी यांनी सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करत संकटकाळात लोकांशी संपर्क साधून काहीजण देवदूतासारखे वावरत आहेत. यामुळे सरकारविरोधात सर्व सामान्यांमध्ये गैरसमज पसरेल, हे योग्य नाही याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा यावेळी खंडपीठाने बोलून दाखवली आणि सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब केली.