पर्यावरण संकटाची ‘जाणीव’ करून देण्यासाठी घरगुती गणेश दर्शन स्पर्धा !

यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनामुक्त घर, पर्यावरण, पाणी हेच जीवन, ग्लोबल वार्मिंग आदी महत्वाच्या विषयाला अधिक महत्व देऊन संपूर्ण मुंबईतील घरगुती गणेश भक्तांसाठी 'जाणीव' या सामाजिक संस्थेमार्फत 'माझा बाप्पा' घरगुती गणेश दर्शन ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे.

    मुंबई : मुंबईसह जगभरात सध्या पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, कोरोना या विषयांची जोरदार चर्चा आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सर्व विषयांची गंभीर दखल घेऊन यंदाच्या गणेशोत्वाच्या निमित्ताने पर्यावरणाची ‘जाणीव’ करून देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘जाणीव’ या संस्थेतर्फे ‘माझा बाप्पा’ घरगुती गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती, ‘जाणीव’ या संस्थेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी दिली. याप्रसंगी या स्पर्धेचे आयोजक संतोष परब, प्रवीण नार्वेकर, दीपक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनामुक्त घर, पर्यावरण, पाणी हेच जीवन, ग्लोबल वार्मिंग आदी महत्वाच्या विषयाला अधिक महत्व देऊन संपूर्ण मुंबईतील घरगुती गणेश भक्तांसाठी ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेमार्फत ‘माझा बाप्पा’ घरगुती गणेश दर्शन ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे.

    स्पर्धकांनी घरगुती गणेशमूर्ती व सजावट, देखावा यांचे दोन फोटो द्यावे लागणारे आहेत. प्रवेश अर्जासाठी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी www.mazabappa.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी माहिती देताना केले आहे.

    यामध्ये प्राथमिक फेरी, अंतिम फेरी व महाअंतिम फेरी घेण्यात येणार आहे. महाअंतिम फेरीतील प्रथम क्रमांक विजेत्यास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक, द्वितीय विजेत्यास जागृती सन्मान व तृतीय विजेत्यास संवेदना सन्मान पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच तीन उत्तेजनार्थ क्रमांकांनाही पारितोषिके देण्यात येणार आहेत. एकूण १३२ अधिक ७५ आणखीन पारितोषिके दिली जाणार आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे.