गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा; सर्व प्रकरणावर राज ठाकरे म्हणतात…

    मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल झूम मीटिंगद्वारे झालेल्या चर्चेचा तपशील पत्रकार परिषदेत सांगितला.  त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या. यामध्ये  दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकाने उघडण्यासाठी सूट द्या, खेळाडूंना जीम, स्वीमिंग पूलमध्ये सवलत द्या, बँकाची जबरदस्ती वसुली थांबवा अशा विविध मागण्या केल्या.

    त्यांच्यावर राज्य आले आहे

    राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आले आहे की, त्यांच्यावर राज्य आले आहे, काल मला हा कोणीतरी विनोद पाठवला ते म्हणाले की, माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसाने बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी होणार आहे का? विषय हा आहे बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असे कृत्य करणार नाही. पण चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पाहातच नाही, ते म्हणाले की,

    कोरोना हा देशाचा विषय

    एकट्या राज्य सरकारला बोलून चालणार नाही, कोरोना हा देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आहे उद्या तिकडे असेल. आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य, बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत तिकडे कोरोना, किंवा लाटा नाहीत. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचे चित्र आहे. त्याचे एक कारण म्हणजे बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि दुसरे म्हणजे तिकडे कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील असे राज ठाकरे म्हणाले.