गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेवून न्यायालयीन चौकशी करा; भाजप नेत्यांची मागणी

भाजप प्रवक्ता आमदार अतुल भातखळकर यांनी परमवीरसींग आणि अनिल देशमुख यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तर, भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष किरिट सोमैय्या यांनी वाझे हा गृहमंत्री देशमुख यांचा खंडणी एजंट होता हे स्पष्ट झाल्याने देमुख यांची पदावरून हकालपट्टी झाली पाहीजे अशी मागणी केली आहे.

  मुंबई : मुंबई पोलिस आयुक्त पदावरून नुकतीच उचलबांगडी करण्यात आलेले सनदी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रूपयांची खंडणी गोळा करून देण्यास आदेश दिले होते असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून केला आहे. त्यानंतर विरोधीपक्षांकडून आक्रमक प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

  भाजप प्रवक्ता आमदार अतुल भातखळकर यांनी परमवीरसींग आणि अनिल देशमुख यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तर, भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष किरिट सोमैय्या यांनी वाझे हा गृहमंत्री देशमुख यांचा खंडणी एजंट होता हे स्पष्ट झाल्याने देमुख यांची पदावरून हकालपट्टी झाली पाहीजे अशी मागणी केली आहे.

  फेसबूक लाईव्ह करून खुलासा करा

  या प्रकरणी वाझेला लादेन नसल्याचे प्रमाणपत्र देणा-या मुख्यमंत्र्यानी फेसबूक लाईव्ह करून खुलासा करावा अन्यथा या प्रकरणात त्यांचाही सहभाग असल्याचे दिसून येईल असे ही भातखळकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, देशमुख यांना शंभर कोटी वाझे कडून कोणी जमा करायला सांगितले? ज्यांनी त्याला सेवेत परत घेण्यासाठी मध्यस्थी केली त्यांनी देखील यात सहभाग घेतला काय? असे प्रश्न उपस्थित करत भातखळकर यांनी या प्रकरणात आता माजी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्याना   देखील अटक करण्याची मागणी केली आहे.

  गृहमंत्र्याचा राजीनामा घ्या

  माजी खासदार डॉ किरिट सोमैय्या यांनी देखील या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत संशय होता तो स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. माजी पोलीस आयुक्तांनी पत्र दिल्याने आता अनिल देशमुख यांची त्वरीत हकालपट्टी झाली पाहीजे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी   वाझे यांच्यामार्फत खंडणी गोळा करण्यास सांगून स्वत: गृहमंत्री अलिप्त असल्याचा आरोप झाल्याने त्यांचा राजीनामा घेबून  उच्चस्तरीय चौकशी केली पाहीजे असे सोमय्या म्हणाले.