18 जिल्ह्यात होम क्वारंटाईन बंद; कोविड सेंटरची संख्या वाढविली जाणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘अनलॉक’च्या मार्गावर असलेल्या राज्यातील काही जिल्ह्यात मात्र पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर, सातारा, अमरावती, सिंधुदुर्ग, रायगड, वाशिम, बीड, गडचिरोली, उस्मानाबाद, अहमदनगर, अकोला, बुलडाणा, यवतमाळ हे चिंता वाढविणारे जिल्हे आहेत.

    मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘अनलॉक’च्या मार्गावर असलेल्या राज्यातील काही जिल्ह्यात मात्र पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या जिल्ह्यातील होम क्वारंटाईन बंद करण्यात येणार असल्याचे व त्याऐवजी कोविड सेंटरची संख्या वाढविली जाणार असल्याची माहिती दिली.

    ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळतील त्या सर्व रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच भरती करण्यात यावे, किंवा कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या बपैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला.

    राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्याच्या स्थितीत काही जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

    पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर, सातारा, अमरावती, सिंधुदुर्ग, रायगड, वाशिम, बीड, गडचिरोली, उस्मानाबाद, अहमदनगर, अकोला, बुलडाणा, यवतमाळ हे चिंता वाढविणारे जिल्हे आहेत.