अंथरूणाला खिळलेल्यांचे घरोघरी लसीकरण!; पालिकेने केले माहिती पाठवण्याचे आवाहन

घरोघरी लसीकरण करण्यात पालिकेला कोणता अडथळा आहे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईत आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, घराबाहेर पडू न शकणारे अपंग आणि आजारी नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यातच आगामी संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यासाठी पालिका वेगाने उपाययोजना करीत आहे.

  मुंबई : दुर्धर आजार किंवा वृद्धापकाळामुळे अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे पालिका (BMC) घरोघरी जाऊन लसीकरण (Vaccination) करणार आहे. यासाठी पालिकेने एक ई-मेल आयडी (email id) तयार केला असून गरजूंनी यावर माहिती पाठवावी (send the information) असे आवाहन केले आहे. या माहितीच्या आधारे पालिका टप्प्याटप्प्याने अशा नागरिकांचे लसीकरण करणार आहे.

  मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र लसींच्या तुटवड्यांमुळे (shortage of vaccines) लसीकरण मोहिमेला वांरवार ब्रेक लागत आहे. पालिकेने दिवसाला दोन लाखांवर डोस देण्यासाठी लसीकरण केंद्रे आणि आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात ठेवले आहे. यानुसार एकाच दिवशी दीड लाखांवर डोस देऊन पालिकेने आपली क्षमता दाखवून दिली आहे.

  दरम्यानच्या काळात घरोघरी लसीकरण करण्यात पालिकेला कोणता अडथळा आहे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (High Court, Mumbai) उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईत आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, घराबाहेर पडू न शकणारे अपंग आणि आजारी नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यातच आगामी संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यासाठी पालिका वेगाने उपाययोजना करीत आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणा तैनात ठेवण्याबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून काम करण्यात येत आहे.

  माहिती ‘या’ मेलवर पाठवा

  पालिकेने याआधी वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणासारखे उपक्रमही महापालिकेने राबवले आहेत. आजारपणासह शारीरिक, वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांनाही लसीचे डोस घरी जाऊन देण्याबाबत पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी अशा नागरिकांची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

  Home vaccination for bedridden patients Appeal to send information made by the BMC