mumn

मुंबई: कोरोनाग्रस्त रूग्णांना वेळेत रूग्णालयात खाट न मिळाल्याने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लक्षण दिसायला लागल्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल

मुंबई: कोरोनाग्रस्त रूग्णांना वेळेत रूग्णालयात खाट न मिळाल्याने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लक्षण दिसायला लागल्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल करता यावे यासाठी मुंबईतील सर्व रूग्णालयातील खाटांची अर्थात बेडची संख्या पुढील आठवड्यापासून ऑनलाईन उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रुग्णालयातील खाटांसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून दर अर्ध्या तासात रिकाम्या झालेल्या खाटांची माहिती तेथे अपलोड होईल. मुंबईत सध्या ७५ हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी १ आणि डीसीएच यांची संख्या ४४ हजार आहे. मुंबई महापालिका या प्रत्येक बेडला विशिष्ट ओळख क्रमांक देणार असून त्या माध्यमातून उपलब्ध बेडच्या संख्येबाबतची माहिती ऑनलाईन करण्यात येणार असून महापालिकेची हेल्पलाईन असलेल्या १९१६ क्रमांकासाठी मार्गिका वाढविण्यात येत असून उद्यापासून त्यावर कार्यवाही सुरु होईल. यामुळे नागरिकांचा प्रतिक्षा कालावधी कमी होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्तांवर उपचार करून ८ हजार ४०० रूग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तर १५ हजार ८०० रूग्णांध्ये कोरोनाची लक्षणे नसून राहीलेल्या रूग्णांवर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कम्युनिटी लिडर नेमले असून त्यांना सहा प्रकारचे काम नेमून देण्यात आले आहे. त्यामध्ये कोमॉर्बीड रुग्णांची माहिती देणे. संस्थात्मक कॉरंटाईनमध्ये मिळणाऱ्या जेवणाची माहिती देणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, खासगी दवाखाने उघडले की नाही याची माहिती ते देतील. यासाठी प्रत्येक वार्डमध्ये वॉररुम उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय ज्या कोरोना रुग्णांना डायलेसीसची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी coviddialysis.in हे पोर्टल तयार करण्यात आले असून डायलिसीससाठी उपलब्ध असणाऱ्या मशीनची माहिती मिळणार आहे. या सुविधेमुळे डायलिसीस अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळणार आहे. रुग्णवाहिकांची संख्या ४५६ करण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीइ किट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उबेर ॲपचे यासाठी सहकार्य घेण्यात येत असून या ॲपवर रुग्णवाहिकांचे लोकेशन दिसणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात रुग्णवाहिकांची कार्यक्षमता अधिक वाढून रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होईल. मुंबईतील ३३ खासगी रुग्णालयांमध्ये ३ हजार ६०० बेडस् नॉनकोविड रुग्णांसाठी तर २ हजार ६२४ बेडस् कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील १०० टक्के खाटा देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व खाटांच्या वितरणाबाबत नियंत्रण कक्षाखाली देखरेख केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.