गृहखरेदीदारांना मिळणार दिलासा, घरांच्या किंमतीत होणार ७ टक्के घट

मुंबई : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यानंतर आता विकासकांनीही गृह खरेदीदारांना उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नरेडकोच्या पश्चिम विभागातील सदस्य असलेल्या विकासकांनी तशी घोषणा केली असून उर्वरित विकासकही याच धोरणाचा स्वीकार करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे घरांच्या किंमती पाच ते सात टक्क्यांनी कमी होतील.

व्यवसायाला मिळणार चालना

कोरोनामुळे ढेपाळलेल्या गृह खरेदीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात डिसेंबर अखेरपर्यंत तीन टक्के तर जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील पालिका आणि नगरपालिका घरांच्या खरेदीवर आकारला जाणारा एक टक्का अधिभारही आता रद्द झाला आहे. तर, मेट्रो सेस मार्च २०२०मध्येच रद्द करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंतच्या घरांच्या खरेदी-विक्रीसाठी आकारल्या जाणाऱ्या पाच ते सात टक्के मुद्रांक शुल्काची रक्कम दोन टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सरकारने सवलत दिल्यानंतर घरांच्या किंमती कमी करण्यासाठी हा शिल्लक दोन टक्के मुद्रांक शुल्काचा भार ग्राहकांच्या माथ्यावर न टाकण्याचा निर्णय नरेडकोने घेतला आहे.

पुढील दोन महिन्यांसाठी हे शुल्क विकासकांकडून अदा केले जाईल. सध्या राज्यातील सुमारे एक हजार गृहपकल्पांमध्ये तशी सवलत दिली जात असल्याचे गृहनिर्णाण व्यवसायिकांसाठी केंद्र सरकार प्रस्तुत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौल्सिलने (नरेडको) सांगितले. घराची किंमत ७५ लाख असेल तर त्यावर साडेचार ते सव्वापाच लाख रुपये मुद्रांक शुल्काची आकारणी होत होती. परंतु, सरकार आणि विकासकांनी दिलेल्या सवलतीमुळे ही रक्कम आता ग्राहकांना आपल्या खिशातून भरावी लागणार नाही. त्यामुळे घरांच्या किंमती सात टक्क्यांपर्यंत कमी होतील.