मोदींचा मेहुलभाई देशातून पळाला कसा? नवाब मलिक यांचा खोचक सवाल

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डॉमनिकन पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकार चोक्सीला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. चोक्सीचे प्रत्यार्पण केले पाहिजे, असे डॉमनिकन कोर्टानेही म्हटले आहे. या घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहुलभाई... मेहुलभाई म्हणत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा?, असा खोचक सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डॉमनिकन पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकार चोक्सीला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. चोक्सीचे प्रत्यार्पण केले पाहिजे, असे डॉमनिकन कोर्टानेही म्हटले आहे. या घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहुलभाई… मेहुलभाई म्हणत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा?, असा खोचक सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.

    जेवढी तत्परता चोक्सीला भारतात आणण्यासाठी आता दाखवली जात आहे, तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही. प्रश्न चोक्सीला भारतात आणण्याचा नाही, तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आहे आणि तो आजही अनुत्तरीत आहे. जनता देखील आता हा प्रश्न विचारतेय. देशातील जनतेचा पैसा बुडवून चोक्सी पळत असताना त्याला रोखण्याची तत्परता मोदींनी का दाखवली नाही? असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

    नीरव, माल्ल्याला कधी आणणार?

    चोक्सीला भारतात आणले जात आहे ही निश्चितच चांगली बातमी आहे. त्याला आणले पाहिजे यात दुमत नाही. परंतु चोक्सीला आणले जात असल्याचा जोरदार प्रचार केंद्र सरकारकडून का केला जात आहे? मेहुल चोक्सीला आणताय हे ठीक आहे, परंतु नीरव मोदी, विजय माल्ल्या यांना कधी आणणार आहात? जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणाऱ्यांची मोठी तुकडी कार्यरत आहे, असेही मलिक म्हणाले.