संशयित आरोपी म्हणून एखाद्याला तुम्ही किती दिवस धाकात ठेवणार ? अर्णब प्रकरणावरुन कोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा, यासाठी अर्णबसह एआरजी आऊटलेअर समुहाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर याआधी व्हिसीमार्फत सुनावणी सुरू होती. मात्र, आता न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. अर्णबला सध्या आरोपी दाखविण्यात आले नसले तरी तपास आणि चौकशी अद्याप सुरू आहे आणि तो आमचा अधिकारही आहे असा दावा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला.

    मुंबई : टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अद्याप आरोपी म्हणून दाखविण्यात आलेले नाही. मात्र तपास सुरू असून तो करण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे. अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आली. त्यावर नाराजी व्यक्त करत तपास सुरू ठेवण्याला काही कालमर्यादा आहेत का ? असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला. तसेच संशयित आरोपी म्हणून एखाद्याला तुम्ही किती दिवस धाकात ठेवणार ? अशी विचारणाही खंडपीठाने यावेळी राज्य सरकारला केली.

    कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा, यासाठी अर्णबसह एआरजी आऊटलेअर समुहाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर याआधी व्हिसीमार्फत सुनावणी सुरू होती. मात्र, आता न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. अर्णबला सध्या आरोपी दाखविण्यात आले नसले तरी तपास आणि चौकशी अद्याप सुरू आहे आणि तो आमचा अधिकारही आहे असा दावा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला.

    खंडपीठाने त्यावर असहमती दर्शवत जर आरोपीविरोधात पुरावे असतील तर तुम्ही ठामपणे त्याला आरोपी म्हणता येईल. मात्र, निव्वळ संशयित आरोपी म्हणून तुम्ही एखाद्याला किती दिवस धाकात ठेवणार? ही गोष्ट केवळ मुंबई पोलीसच नाही, एनआयए, सीबीआय, एनसीबी यांसह देशातील सगळ्याच तपास यंत्रणांना लागू होते. असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

    त्यावर सदर प्रकरण न्याप्रविष्ट असेपर्यंत अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या एआरजी मीडियाच्या कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही सरकारी वकीलांनी दिली. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.