मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले
मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण होत आले तरी शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांना देशव्यापी विरोध व्यक्त करण्यासाठी येत्या 26 मार्चला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या या बंदचा भाग म्हणून जाहीर केलेल्या आंदोलन कार्यक्रमात विविध विषयांना हात घालण्यात येणार आहे.

    मुंबई : येत्या 26 मार्च रोजी देशातील शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध समविचारी संघटनांनी ‘भारत बंद’ आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. यात सर्व समविचारी संघटना आणि कामगार तसेच शेतकरी संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले. नवले यांनी भारत बंदसाठी केल्या जात असलेल्या तयारीबाबतची माहिती नवराष्ट्रला दिली.

    दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण होत आले तरी शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांना देशव्यापी विरोध व्यक्त करण्यासाठी येत्या 26 मार्चला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या या बंदचा भाग म्हणून जाहीर केलेल्या आंदोलन कार्यक्रमात विविध विषयांना हात घालण्यात येणार आहे.

    येत्या 15 मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चा आणि केंद्रीय कामगार संघटना खासगीकरणाच्या आणि पेट्रोल-डिझेल-गॅसच्या भाववाढीच्या निषेधार्थ उग्र निदर्शने करणार आहेत. तर त्यानंतर 23 मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या शहीद दिनी देशभर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सभा, परिसंवाद, प्रचार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

    26 मार्च रोजी भारत बंद आंदोलन करण्याची हाक संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटनांनी दिली आहे. महाराष्ट्रात सर्व समविचारी पक्ष-संघटनांना सोबत घेत भारत बंद यशस्वी करण्यासाठी सध्या विविध समविचारी संघटनांशी बोलणी सुरू असल्याचेही नवले यांनी सांगितले.