तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं ?; मुख्यमंत्र्यांनी केले हे आवाहन

  मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे.

  दरम्यान या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी संवाद साधला. कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्राथमिक निवेदनातील मुद्दे…

  माझी टीम मजबूत व कुशल आहे.

  कोरोन विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू

  • घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या फॅमिली डॉक्टर , ज्याला मी “ माझा डॉक्टर” असे म्हणतो त्याला वेळीच मुलाला दाखवा म्हणजे उपचार लगेच सुरु करता येतील.
  • माझे कुटुंब, माझी जबादारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे.
  • तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे.
  • पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले.
  • गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो.
  • रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या.
  • डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे
  • कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या.
  • दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाउले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवीत आहोत
  • लसीकरणाच्या बाबतीतही मी परत सांगतो की १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे.
  • आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला झात्री आहे, जून नंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरु करू शकू