
मुंबई : तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिस तपासात या तरुणाबद्दल धक्कादाय माहिती समोर आली आहे.
तक्रारदार २४ वर्षीय तरुणी मालाड पूर्वेकडील वर्दळीच्या रस्त्याने जात असताना या नराधमाने तिचा पाठलाग केला. यानंतर तिने तिला थांबवत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यानंतर या नराधमाने भरस्त्यात तिला मिठी मारुन तिचे चुंबन घेत तिचा विनयभंग केल्याचे या तरुणीने पोलिस तक्रारीत म्हंटले आहे.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे भेदरलेल्या तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. यानंतर आरोपीने तेथून धूम ठोकली. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्याला अटक केली.
कल्पेश देवधरे असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो कांदिवली पश्चिम परिसरात राहतो. मुंबईत त्याने अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केले असून, गेल्या नऊ वर्षांत त्याला १२ वेळा अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.