Fraud

आठ कोटी नव्वद लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या पती-पत्नीला (Husband And Wife Involved In Fraud) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक  केली आहे.

    मुंबई : युनायडेट इंडिया इन्शुरन्स कंपनीत (United India Insurance) अफरातफर करून आठ कोटी नव्वद लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या पती-पत्नीला (Husband And Wife Involved In Fraud) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक  केली आहे. या कंपनीत पती आणि पत्नी दोघंही असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत होते. संस्थेतील काहीजणांना हाताशी धरून या दोघांनी वेगवेगळ्या सात बँक खात्यांमध्ये आठ कोटी नव्वद लाख  रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

    मुख्य आरोपी असणारा कुशल सिंग हा कंपनीच्या चर्चगेट कार्यालयात काम करत होता. त्याच्याकडे कंपनीच्या कॉर्पोरेट सेल अकाऊंटची जबाबदारी होती. त्याच्या पत्नीनं संस्थेशी संबंधित काहीजणांसोबत एक योजना आखून वेगवेगळी सात बँक खाती काढली आणि त्यात कोट्यवधींची रक्कम जमा केली. कंपनीचे उपव्यवस्थापक जयदीप सिन्हा यांच्या तक्रारीनंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली.

    मे मध्ये कंपनीच्या चेन्नईतील मुख्य कार्यालयात मुंबईतून एक निरोप देण्यात आला. मुंबईतील कंपनीच्या एका खात्यातून संशयास्पद व्यवहार करण्यात आले असून कोट्यवधी रुपये गायब असल्याचं सांगण्यात आलं. याबाबत कंपनीनं अंतर्गत चौकशी केली असता धक्कादायक बाबी उघड झाल्या.

    असिस्टंट मॅनेजर कुशल सिंह आणि त्याच्या पत्नीनं वेगवेगळ्या सात खात्यांमध्ये मिळून आठ कोटी नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पंचाण्णव रुपये ट्रान्सफर केल्याचं सिद्ध झालं. मुंबई आणि जयपूरमधील वेगवेगळ्या बँकांमध्ये ही खाती उघडण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून यावर्षी एप्रिल दरम्यानच्या काळात हे व्यवहार करण्यात आले होते.

    कंपनीतील एकाही अधिकाऱ्याला संशय येऊ न देता हे व्यवहार दोघांनी कसे पार पाडले, याबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे. कंपनीतील आणखी काही कर्मचाऱ्यांचा यात सहभाग होता का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.