प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

माळीण दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने(BMC) मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांचे सर्वेक्षण(Survey Of Huts) हाती घेऊन उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही कागदावरच राहिली आहे.

  मुंबई: मुंबईतील(Mumbai) दरडीच्या छायेत राहणाऱ्या २१ हजारापेक्षा अधिक झोपडीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. झोपड्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती बांधण्यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली जाते. मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने हाेत असलेल्या या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संरक्षक भिंतींचे बांधकाम निकृष्ट असल्यानेच माेठी दुर्घटना घडल्याचा आराेप आता हाेत आहे. मात्र आराेप प्रत्याराेपाच्या गदाराेळात दरडीलगतच्या झाेपड्यांचा प्रश्न जैसे थे राहिला आहे.

  माळीण दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील डोंगर उतारावरील झोपड्यांचे सर्वेक्षण हाती घेऊन उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही कागदावरच राहिली आहे.

  घाटकोपर असल्फा व्हिलेज, एन्टॉप हिल, चेंबूर- वाशीनाका, भांडुप, कुर्ल्यातील विस्तीर्ण कसाई वाडा आदी ठिकाणच्या दरडीखाली सुमारे २१ हजार झोपड्या वसल्या आहेत. काही कच्च्या तर काही पक्क्या बांधकाम केलेल्या या झोपड्या एकमेकांना आधार देत अनेक वर्षापासून दरडींलगत वसल्या आहेत. या झोपड्यांवर कोणताही तोडगा, उपाययोजना पालिका व सबंधित यंत्रणेने काढलेला दिसत नाही. या झोपड्यांचे काय ? याबाबत विकास आराखड्यात काय नियोजन केले आहे. त्याबाबत काेणतीला माहिती प्रशासनाला नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथील रहिवाशांना दरडीलगत नागरिक जीव मुठीत घेवून जगत आहेत.

  दरडींच्या लगत राहत असलेल्या नागरिकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन होणे आवश्यक आहे. नागरिक इतर भागात जात नाहीत. त्यामुळे रहिवाशांचे त्याच विभागात पुनर्वसन केले तरच ते तिथून जायला तयार होतील. तुम्ही जर विक्रोळी मधील लोकांना बोरिवलीमध्ये पाठवले तर ते जाणार नाहीत. मात्र तेवढी जागा उपलब्ध होणेही कठीण आहे. नागरिकांचे पुनर्वसन स्थानिक पातळीवर करावे.

  - रवी राजा, विराेधी पक्षनेते, मुंबई महानगरपालिका

  डोंगर उतारावरील या झोपड्या दगडाचा किंवा कचऱ्याचा आधार घेत उभारण्यात आल्या आहेत. एकीकडे दरडीच्या भयाखाली तर दुसरीकडे झोपडी दादांच्या दहशतीखाली येथील रहिवाशांना राहावे लागत आहे. पावसाळा जवळ आला की काही दिवस अगोदर येथे राहणे धोक्याचे आहे. तातडीने स्थलांतरित करावे, अशा नोटिसा पालिकेचे अधिकारी चिटकावून मोकळे होतात.मात्र त्या झोपडीधारकांना कुणाचा आधार नसतो. हे अधिकारी पुढील पावसापर्यंत फिरकत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. यंदाही पावसापूर्वी अतिधोकादायक ठिकाणांचा सर्वेक्षण करून रहिवाशांना स्थलांतरित करण्याच्या नोटिसा दिल्या. त्वरीत स्थलांतरीत व्हावे, अशा नोटिशीमध्ये सूचना असतात. मात्र इतकी कुटुंबे स्थलांतरीत कुठे होणार? हा प्रश्न असल्याने पाऊस संपेपर्यंत जीव मुठीत घेऊन येथील अनेक रहिवाशांना त्याच झोपड्यात राहण्याचा निर्णय घ्यावा लागतो.