I accept your challenge, knock me down; Ajit Pawar and Sudhir Mungantiwar are at loggerheads

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी सभागृहात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आव्हान प्रतिआव्हानांचा कलगीतूरा रंगला. यावेळी शाब्दिक चकमक रंगली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात हा सामना झाला. मला विरोध करणारा पुढील विधानसभा निवडणुकीत निवडूण येत नाही, असे मुनगंटीवार यांनी सभागृहात सुनावले तर यावेळी अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना मी तुमचे आव्हान स्विकारले मला पाडून दाखवा, असे जाहीर प्रती आव्हानच दिले.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी ही ठिणगी पडली. सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत होता. यावेळी सुधीर मुनगंटीवार हे ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत होते. सुधीर मुनगंटीवार सरकारवर आरोप करत असताना खाली बसून महिला आमदारांनी त्यांच्या भाषणावर टीपन्नी केली. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असे म्हटले. त्यानंतर अजित पवार यांनी उठून त्यांना प्रतीआव्हानच दिले.

अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना सुनावले

पुरवणी मागण्यांवर उत्तर द्यायला उभे राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देत असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत त्यांना हटकले. यानंतर अजित पवार यांनी आक्रमपणे मुनगंटीवार यांचा समाचार घेतला. सुधीर मुनगंटीवार हे बोलत असताना मलाही त्यांना उत्तर देण्याची इच्छा झाली होती. मात्र मी मध्ये बोललो नाही. म्हणजे हे बोलतील ते खरे आणि आम्ही बोलायला उभे राहिलो की गोंधळ होणार, असे म्हणत अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना सुनावले.

पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत

तीन पक्षांचे सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने त्यांना दुःख झाले. हे सांगत होते हे सरकार सहा महिन्यात जाईल, पण ते गेले नाही, वर्षात जाईल म्हणाले, पण तरीही गेले नाही. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते आमच्या पाच जागा येतील सत्ताधार्‍यांची एक येईल. पण निकाल वेगळे लागले. नागपूरची जागा तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते खूप झोंबले आहे. नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपमधल्या कथित गटबाजीवर टोलेबाजी केली.

तुमच्याकडे आलेले परत येतील लक्ष ठेवा

पुण्यात चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते, पण आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. तीच गोष्ट औरंगाबाद, सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. धुळे-नंदुरबारची जागा अमरिश पटेल यांना भाजपने तिथे घेतल्याने आली. अमरावतीला चुकले, पण एक समाधान आहे तिथे भाजपचा आला नाही. शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग, याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिले आहे. आता मला त्यांना सांगणे आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा, असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.