महाराष्ट्रातील शिक्षकाने जागतिक पातळीवर आपली परंपरा कायम राखली याचा मला अभिमान ! : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई : “टीचिंग थ्रू काँन्फरन्स कॉल” या उपक्रमाद्वारे कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे बीज पेरण्याचे कार्य सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक बालाजी जाधव यांनी केले. हनी बी नेटवर्क क्रिएटिव्हिटी अँड अन्क्लुझिव्ह इनोव्हेशन हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी बालाजी जाधव सरांचा विशेष सत्कार केला.

८७ देशातील २,५०० स्पर्धकांतून देशभरातील अकरा विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक बालाजी जाधव यांच्या या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर गेले. कोरोनाच्या टाळेबंदीत आधुनिक सुविधांपासून वंचित असलेल्या, स्मार्ट फोन नसतानाही दूरसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजसोप्या पध्दतीने, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यातील तसेच देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य बालाजी जाधव सरांनी केले.

याचे कौतुक शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या या जन्मभूमीत आमच्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षक जे नवनवीन प्रयोग व उपक्रम करत आहेत यामुळे जागतिक पातळीवरही शिक्षकांनी जे उल्लेखनीय कार्य केले याचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.